जळगाव जिल्हा पोलीस दलात कठोरा गावचा डंका! उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून हर्षल उर्फ भोजू पाटील यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विशेष सन्मान
![]() |
| जळगाव : जिल्हा पोलिस पाटील मेळाव्या प्रसंगी कठोरा गावचे भुमिपुत्र पोलिस पाटिल हर्षल ( भाजू ) पाटिल यांचा गौरव करतांना जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे |
एकसंघ न्यूज
भुसावळ /वरणगाव, ता. १२ : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस आणि ग्रामीण नागरिकांमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा असणाऱ्या पोलीस पाटलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य 'पोलीस पाटील मेळाव्यात' भुसावळ तालुक्यातील कठोरा गावचे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष पोलीस पाटील हर्षल उर्फ भोजू पाटील यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल 'उत्कृष्ट पोलीस पाटील' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडल्याने संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नागरीकांमध्ये घट्ट समन्वय
जळगाव येथील या दिमाखदार मेळाव्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला, ज्यामध्ये हर्षल उर्फ भोजू पाटील यांनी आपल्या गावात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलीस प्रशासन व नागरिकांमध्ये घट्ट समन्वय निर्माण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेची विशेष दखल घेण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन जेव्हा भोजू पाटील यांचा सत्कार झाला, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
शांतता, सलोखा आणि सुव्यवस्थेसाठी कायम तत्पर
कठोरासारख्या ग्रामीण भागात सामाजिक शांतता, सलोखा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी भोजू पाटील सतत तत्पर असतात. गाव पातळीवर होणारे छोटे-मोठे वाद आपापसात मिटवणे, पोलिसांना तपासात व गुप्त माहिती मिळवण्यात मोलाची मदत करणे आणि शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांच्या या निष्ठावंत आणि समर्पित सेवेमुळेच आज त्यांना संपूर्ण जिल्ह्यात हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
पोलिस पाटिल मेळाव्यास यांची उपस्थीती होती
याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
भोजराज पाटलांवर शुभेच्छा चा वर्षाव
कठोरा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या हर्षल उर्फ भोजू पाटील यांचे हे यश संपूर्ण भुसावळ तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे. पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समजताच कठोरा गावासह भुसावळ परिसरातून लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून भोजू पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा