हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडे ; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
एकसंघ न्यूज
वरणगाव, ता. १३ :हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
रविवार ( ता.१३ ) दुपारी १२:०० वाजता धरणाचे १६ दरवाजे १ मीटरने उघडून ३९,९४१ क्युसेक वेगाने विसर्ग केला जात होता. मात्र, धरणातील आवक नियंत्रित होत असल्याचे पाहून दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास १६ पैकी ४ दरवाजे बंद करण्यात आले असून, सध्या १२ दरवाजे १ मीटरने उघडे ठेवण्यात आले असुन २९,४१७ क्युसेक (८३३ क्युमेक्स) वेगाने तापी नदीत पाणी सोडले जात आहे.
धरणाची सद्यस्थिती (दुपारी ४:०० वाजता):
सध्याची पाणीपातळी: २१३.०७० मीटर (पूर्ण क्षमता: २१४.००० मीटर)
एकूण जलसाठा: ३३५.२० दशलक्ष घनमीटर (८६.३९%)
उपयुक्त जलसाठा: २०२.२० दशलक्ष घनमीटर (७९.२९%)
धरणाचे उघडे दरवाजे: १२ दरवाजे (१ मीटरने उघडे)
तापी नदीपात्रातील विसर्ग: २९,४१७ क्युसेक (८३३ क्युमेक्स)
कॅनाल विसर्ग: १५० क्युसेक (४.२५ क्युमेक्स)
पाणलोट क्षेत्रात सरासरी २३.२ मि.मी. पावसाची नोंद
मागील २४ तासांत हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर सरासरी २३.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यामध्ये देढतलाई (६०.२ मि.मी.), एरडी (५४.२ मि.मी.) आणि बऱ्हाणपूर (४७.२ मि.मी.) येथे जोरदार पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय टेक्सा (३३.८ मि.मी.), चिखलदरा (६.० मि.मी.), लोहारा (५.२ मि.मी.) आणि लखपुरी (२.६ मि.मी.) येथेही पाऊस झाला आहे.पाणलोट क्षेत्रातून होणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहता धरणातील विसर्गात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांनी, विशेषतः सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन धरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा