आयुध निर्माणीत कंत्राटी कामगारांचा अधिकाऱ्यांकडून घरगड्यासारखा वापर?
कंत्राटदारांना धमकावून कर्मचाऱ्यांकडून घरची कामे करून घेतल्याचा गंभीर आरोप ; तरुणींकडून स्वयंपाक करून घेण्यापर्यंत मजल, संजय खन्ना यांची कारवाईची मागणी !
एकसंघ वृत्तांत
वरणगाव, ता. ३ : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे आणि शासकीय कामे मार्गी लागावीत, या उद्देशाने आयुध निर्माणी वरणगावमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीने विविध कामे सुरू आहेत. या माध्यमातून परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणी, विवाहित महिला तसेच पुरुषांना रोजगाराची संधी मिळत आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या कामांवर अवलंबून आहे. मात्र, याच रोजगारा च्या संधीचा आयुध निर्माणी तील काही मोजक्या अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक फायद्यासाठी कामगारांचा घरगडी म्हणून गैरवापर होत असल्याचा धक्का दायक प्रकार पुढे आला आहे.
कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कामाऐवजी काही अधिकारी स्वतःच्या खासगी कामांसाठी वापरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कंत्राटदारांना दबावाखाली ठेवून त्यांच्या कर्मचाऱ्यां कडून अधिकाऱ्यांच्या घरासमोरील केरकचरा उचलणे, बागबगीच्यांची स्वच्छता करणे, परिसराची साफ सफाई करणे तसेच घरातील अन्य कामे करून घेतली जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकाराची गंभीरता एवढ्यावरच थांबत नाही. काही अधिकारी कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या तरुणींना आपल्या घरी बोलावून त्यांच्याकडून स्वयंपाका सारखी घरगुती कामे करून घेत असल्याचीही धक्का दायक माहिती समोर आली आहे. रोजगाराची गरज असल्याने या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आयुध निर्माणीतील काही अधिकाऱ्यांवर दूध चोरीसंदर्भातील आरोपही झाले असून, या प्रकरणाची वरणगाव पोलीस ठाण्यात चर्चा झाल्याची परिसरात चर्चा आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या कथित प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय खन्ना यांनी आवाज उठविला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्याकडून खासगी कामे करून घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात आयुध निर्माणीच्या महाव्यवस्थापकांच्या स्वीय सहाय्यकालाही त्यांनी माहिती कळविली आहे.शासकीय कामासाठी मंजूर होणारा पैसा आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च हा जनतेच्या पैशातून केला जातो. मग याच कर्मचाऱ्यांचा वापर अधिकाऱ्यांच्या घरगुती कामांसाठी करण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना कोणी दिला? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
आता आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करणार का? कंत्राटी कर्मचाऱ्यांना दबावमुक्त वातावरणात काम करण्याची हमी मिळणार का? की अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीकडे प्रशासन डोळेझाक करणार, याकडे वरणगावकरांचे लक्ष लागले आहे.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा