नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वरणगावात महाविकास आघाडीचा मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
एकसंघ न्यूज, विनोद सुरवाडे.
वरणगाव (प्रतिनिधी): देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या विरोधात वरणगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता. २१) भव्य मोर्चा व आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात वरणगाव येथील नवीन नगरपरिषद कार्यालयापासून करण्यात आली. तिरंगा सर्कलमार्गे हा मोर्चा वरणगाव पोलीस स्टेशनपर्यंत नेण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाचे शांततेत विसर्जन करण्यात आले.
महाविकास आघाडीने सादर केलेल्या निवेदनात देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षा प्रक्रियेवर पेपरफुटी प्रकरणामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आणि असंतोष निर्माण झाला असून, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कथित लाठीहल्ला झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांनीही आपल्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्यास जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला. "वंदे मातरम्", "भारत माता की जय", "मोदी हमसे डरता है, पुलिस को आगे करता है", "नहीं चलेगी... नहीं चलेगी... दादागिरी नहीं चलेगी", "इंकलाब जिंदाबाद" अशा विविध घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या हातात भारतीय तिरंगा, भारतीय राज्यघटनेच्या प्रती तसेच सोनम वांगचुक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धारही आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केला.या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, दीपक मराठे, प्रा. मनोज देशमुख, चंद्रकांत शर्मा, डॉ. अहेसान अहमद, कुलदीप देशमुख, प्रा. राहुल जोहरे, संभाजी पाटील, अशफाक काजी (वरणगाव शहराध्यक्ष, काँग्रेस), नरेंद्र इंगळे, शाहरूख खान, पंकज पाटील, पी.एच. भैसे, राहुल सोनवणे, जितेंद्र तावडे, नगरसेवक निलेश चौधरी, सुनील भोई, संजीव कोळी, डॉ. सुनील अहीरराव, मनोज अग्रवाल, शे. हनीफ शे. रहिम, शे. समीर शे. खाटीक, निर्मला जवरे, अनिता निकम, विश्रांती पवार, श्रीमती एस. डी. कापसे, पूजा भिलावे, अनिता लोखंडे, अजहर सागर अली, तेजस चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीने दिलेल्या या सर्व मागण्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या वेळी दिला.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा