वरणगाव नगर परीषदेच्या सभागृहात महाशिबीराचे आयोजन ! गरजूंना मिळणार शासकीय योजनांचा लाभ, महसुल व वन विभागा अंतर्गत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान"
[एकसंघ न्यूज, विनोद सुरवाडे.]
महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार वरणगाव आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचं महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न लक्षात घेता या प्रश्नांचे निराकरण आणि जनतेच्या तक्रारी तातडीनं निकाली काढणे या सोबतच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भुसावळ तालुक्यात मंडळ स्तरावर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर अभियान' वरणगाव येथील नगर परीषदेच्या सभागृहात येणाऱ्या शुक्रवारी ( ता. १५ ) सकाळी ९.३० वाजे.पासून राबवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार निता लबडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' राबवण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर तहसील कार्यालय भुसावळ व वरणगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने वरणगाव येथील नगर परिषदेच्या सभागृहात येणाऱ्या शुक्रवार ( ता. १५) सकाळी ९.३० वाजता आयोजित केले आहे.. शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विविध प्रकारचे दाखले, महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजनेबाबत मार्गदर्शन, दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, नगरपरिषद मार्फत दिले जाणारे विविध दाखले ,आयुष्यमान भारत कार्डवाटप, कृषी योजनांची माहिती या सर्व योजना संबंधित माहिती आणि सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. नागरिकांचे आणि शेतकरी बांधवांचे अर्ज देखील या शिबिरात स्वीकारले जातील तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार नीता लबडे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा